शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

त्याचा अपूर्ण संवाद.

आज प्रिया ऑफिसमधून घरी आल्यावर, आवरून तिने फोन हातात घेतला. तिच्या ऑनलाईन अकाऊंटवर एक अनोळखी मेसेज होता. म्हणून आगोदर तिने एवढ लक्ष दिलं नाही.

रात्री जेवण झाल्यानंतर पुन्हा एक मेसेज आला, “Hi”. कोणाचा असेल हा मेसेज असा विचार करत अतानाच पलिकडून अजून एक मेसेज आला, “मी अजय सरपोतदार.” नाव तर थोडं अनोळखी होतं पण नवासमोरचा चेहरा मात्र ओळखीचा वाटत होता. काहीवेळाने तिच्या ध्यानात आलं आणि तिने देखील रिप्लाय दिला.

“Hi...”

अजय - “ओळखलस का मला तू ?”

प्रिया - “नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. ओळखलं ना!”

अजय - “कशी आहेस? काय करतेस सध्या?”

अश्या फक्त एक ते दोन प्रश्न उत्तरांनंतर लगेचच त्याने त्याचा फोन नंबर प्रियाला पाठवला.

अजय – “हा माझा नंबर आहे. तुला वेळ मिळेल तेव्हा मला कॉल कर.”

त्याचा हा मेसेज पाहून ती थोडी गडबडली. अस अचानक भयानक एके दिवशी याचा मेसेज येईल अस तिला स्वप्नातसुद्धा वटलं नव्हत.

(तर हा अजय सरपोतदार म्हणजेच प्रियासोबत इंजिनिअरींगच्या कॉलेजात, वर्गात कायम मागच्या बाकावर बसणाऱ्या मुलांपैकी एक. कधीही अभ्यासात पुढे नाही, कॉलेजला नियमित येणं नाही, शिक्षकांचा ओरडा एवढाच काय तो त्याचा शिक्षकांसोबतचा संवाद.)

हा मुलगा मला का बरं मेसेज करतोय?, अस अचानक त्याला काय काम पडलं असेल माझ्याकडे? असा विचार करत असतानाच थोडं अडून आणि खडूसपणा दाखवत प्रियाने त्याला विचारले, “आज कसा काय तू मला संपर्क केलास? काही काम होत का तुझ? त्यावर तो म्हणाला, ‘होय, खरतर एक काम होत तुझ्याकडे..फोन करू शकतो का मी?’ यावर काहीसा निःश्वास टाकत, तिने त्याला होरार्थी उत्तर देत, उद्या करते कॉल असं म्हणाली.

दुसऱ्या दिवशी त्याने प्रियाला त्याच्या नवीन होऊ घातलेल्या व्यवसायाबद्दल ऑनलाईन माहिती पाठवली. तिला त्याची व्यावसायिक कल्पना आवडली आणि तिने त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी त्याला सरळ कॉल केला, ‘कधी सुरु केलास तू हा व्यवसाय?, ही कल्पना चांगली आहे, अश्याप्रकारे संभाषण सुरु झालं पण; जास्तवेळ बोलणं झालं नाही. तिने ऑफिसमधून लंचब्रेक मध्ये वेळात वेळ काढून त्याला फोन केला होता.

पण अजयने प्रियाशी आजून बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने प्रियाला सांगितले की त्याला कॉलेजमध्ये असताना तिच्याशी बोलण्याची कधी संधी मिळाली नव्हती. त्यानंतर संध्याकाळी अजयने प्रियाला रीतसर मेसेज करून, ‘प्रिया, तुला मी आता फोन करू शकतो का?’ अशी विनंती केली..

त्याच्या या गोष्टीवरून प्रिया प्रभावित झाली. कोणत्याही मुलीला पाहिलांदा फोन करताना तिचा वेळ, तिच्या आजूबाजूची परिस्थिती लक्षात गेऊन, तिची परवानगी घेऊन मगच तिला फोन करणे, त्याचा हा गुण तिला प्रचंड आवडला. आणि तिने त्याला होकारार्थी मेसेज पाठवला. त्यानंतर त्यांचे बराचवेळ बोलणे झाले. जुन्या आठवणी निघाल्या.

अजय – मला आधी वाटलं होत की तू बोलशील की नाही. इंजिनिअरींग करून जवळपास चार ते पाच वर्षे लोटली. त्यात माझ्यासारख्या मुलाची इमेज कशी असेल तुझ्यासारख्या पुढच्या बाकावर बसणाऱ्या मुलीच्या मनात याची कल्पना होतीच मला. तरीही मनातल्या एवढ्या वर्षांनंतरच्या आर्त इच्छेमुळे मी स्वतःला अडवू शकलो नाही. अशा करतो तुला अडचण नसेल.

यावर प्रियाने त्याला विचारले, ‘कॉलेजमध्ये असताना का बर बोलला नाहीस कधीच तू माझ्याशी? आणि आता असे  अचानक मेसेज करायचे कसे सुचले?

त्यावर अजय म्हणाला, मी एकदा तुला तुझ्या एका मैत्रिणीमार्फत, ‘माझी डान्स पार्टनर बनशील का?’ असे विचारले होते. पण मला असे समजले की तू नाही म्हणाली होतीस.

प्रिया –अरे, मला तर काहीच आठवत नाहीये. खरच...

अजय – अग असुदे काही हरकत नाही. मी सहजच विषय काढला होता.

थोडा वेळ झाल्यानंतर प्रिया म्हणाली अजय, मला आता जाव लागेल. माफ कर; पण आपण नंतर बोलूया. इकडे अजयचे मन मात्र भरले नव्हते. पण जड मनाने तो, ‘काही हरत नाही’ असे म्हणाला आणि त्यांनी फोन ठेवला.

अजयची ती रात्र सकाळची वाट बघण्यात सरता सरत नव्हती. त्याला एक अन एक क्षण तिच्याशी बोलण्यात घालवायचा होता. एवढ्या वर्षांनी तो त्याच्या कॉलेजमधल्या क्रश म्हणजेच त्याच्या आवडीच्या व्यक्तीसोबत बोलत होता.

प्रियाला मात्र अजयच्या मनात तिच्याबद्दल असलेल्या त्याच्या भावनांची कल्पनाच नव्हती.

असेच पुढचे पाच सहा दिवस वेळ मिळेल तसा ते दोघे एकमेकांशी बोलू लागले. प्रियाच्या आयुष्यात कोणी नाही ना.. असा प्रश्न अजयला पडला होता पण प्रियाला असे स्पष्ट कसे विचारावे असा विचार करत असतानाच प्रियाने त्याला, त्याची छेड काढतच शलाका बद्दल विचारले....

शलाका म्हणजे प्रियाची कॉलेज सिनिअर. अजयची जुनी आणि खूप जवळची मैत्रीण. खर तर प्रियाला अजयबद्दल फारसं माहिती नव्हत. पण अश्या गोष्टी कॉलेजमध्ये लपून थोडीच राहतात... अजय- शलाका बद्दल प्रीयाला देखील माहिती होत.

प्रिया – अरे, काय मग शलाका आणि तू केव्हा लग्न करताय? आता तर मला देखील बोलवावं लागेल तुमच्या लग्नाला आता..

प्रियाचे हे बोलणे ऐकून अजय थोडा नाराज झाला. शलाकाच्या विषयामुळे त्याचा मुडची वाटच लागली.

प्रियाने त्याला काय झालं असे विचारल्यावर त्याने सांगितले की शलाकाचे आता लग्न झाले आहे. आम्ही एकत्र नाही आहोत. तुला माहिती आहे की नाही ते ठाऊक नाहीये पण कॉलेजच्या शेवटच वर्ष सुरु व्हायच्या आतच आम्ही वेगळे झालो होतो.

हे ऐकून प्रियाने त्याची माफी मागत विषय बदलला. आणि त्याला विचारले की, गेल्या वर्षी रोहनच्या लग्नाला का आला नाहीस? (रोहन हा प्रियाचा चुलतभाऊ. आणि अजयचा मित्र)... अश्या गप्पा चालू असतानाच आजयने देखील प्रियाला विचारले, तुझा लग्नाचा विचार आहे की नाही? की कोणी शोधून वैगरे ठेवला आहे?

त्यावर प्रिया म्हणाली, छे! सध्या माझं पूर्ण लक्ष माझ्या करिअरवर आहे. या सगळ्यासाठी आता माझ्याकडे मुळीच वेळ नाहीये.

म्हणजे एकंदरीत प्रियाच्या आयुष्यात कोणी नाहीये. हे अजयच्या लक्षात आलं आणि म्हणूनच अजयने प्रियाला त्याच्या मनातल्या भावना लवकरात लवकर सांगण्याचा निर्णय घेतला. अश्याच एके दिवशी संध्याकाळी ते दोघे बोलत असतानाच अजयने असा माहोल निर्माण केला की तो आता प्रियासमोर व्यक्त होणार तेवढ्यातच प्रियाला फोन ठेवावा लागला आणि त्याचं बोलणं अर्धवट राहिलं.

पुढचा दिवस उजाडला. सकाळपासून अजय प्रियाच्या फोनची वाट बघत होता. कॉलेजमध्ये असल्यापासून अजय प्रियाशी बोलू इछित होता पण त्याने कधी ते धाडस केले नाही. कॉलेज संपले आणि त्यानंतर तो त्याच्या आयुष्यात व्यस्त झाला. मध्ये मध्ये त्याला तिची आठवण येत असे. शेवटी एकेदिवशी त्याने तिला संपर्क केलाच.. ते ही तब्बल चार वर्षांनंतर. आता त्याला त्याची आतुरता आटोक्यात आणता येत नव्हती. कधी तो प्रियाला त्याच्या मनात तिच्याबद्दल साठवून ठेवलेल्या भावनांबद्दल कबूली देतोय असे त्याला झाले होते.

दुपारी अजयने प्रियाला फोन केला. नेहमी प्रमाणे प्रिया अजयशी बोलू लागली; पण अजय मात्र वेगळ्याच विषयावर बोलणार होता. त्याने आज प्रियाला थेट विचारले, ‘प्रिया, तुझ्या आयुष्यात कोणी आहे का?’

प्रिया थबकली, तिला काहीसा अंदाज आला होता कि तो का असे विचारतोय.... म्हणतात ना मुलींना अश्या गोष्टी लगेचच समजतात. पण तरीही तिने कोणताही वेगळा समज नको व्हायला म्हणून अजयला स्पष्ट विचारले,

प्रिया – काय रे, असा का मध्येच प्रश्न विचारत आहेस?

अजय – अग, तू सांग ना...

प्रिया – मला आवडतो एक मुलगा; पण त्याच्या मनात माझ्याविषयी काय आहे हे मला अजून ठाऊक नाही आहे. किंबहुना मीच आजतागत कधी त्याला स्पष्ट विचारले नाही. कारण आता माझ्यासाठी त्याहून ही महत्वाचे माझे करिअर आहे. सध्या मला कोणत्याच नात्यामध्ये अडकायचे नाही आहे. माझ पूर्ण लक्ष माझ्या पुढील भवितव्यावर आहे.

अजयला प्रियाचे हे शब्द टोचत होते. जणूकाही त्याला हे सारे ऐकायचेच नव्हते. प्रियाचा साधेपणा, तिचं बोलणं, तिची अदा हे सारं अजयला भावत होतं. आणि तिच्या याच साधेपणावर तो भाळला होता. पण प्रियाचे प्रेमाबद्दलचे मत ऐकून त्याला पुढे काय बोलावे हे सुचत नव्हते. त्याला याचे वाईट वाटत होते की जर तो प्रियाशी काही वर्षांआगोदर बोलला असता, तर कदाचित आज चित्र वेगळ असलं असत. पण तो प्रियाच्या विचारांचा आदर करत, तिला म्हणाला...

अजय – अग प्रिया, मला तू खरच आवडतेस पण याचा अर्थ असा नव्हे की तुझ मत सुद्धा असचं असायला हाव. मला माझ्या भावना व्यक्त केल्याशिवाय चैन पडला नसता. म्हणूनच मी ते तुला सांगितले. तू कोणताच संकोच मनात ठेवू नकोस.

प्रियाला अजयचं बोलण, त्याच्या समंजसपणाचा हेवा वाटला. आणि तिने अजयला, ती का त्याच्यासोबत पुढे जाऊ शकत नाही याचे आणखी एक कारण सांगितले. ते म्हणजे, रोहन... होय, प्रियाला वाटले की जर मी अजयसोबत जवळीक वाढवली तर ते रोहनला आणि इतरांना कदाचित वावग वाटेल.

अजय – अच्छा..! हे खरं कारण आहे तर... प्रिया तू जरा जास्तच विचार करतेस असे वाटत नाही आहे का ग तुला? पुढे जाऊन आपल्या नात्यावर तुझा भाऊ रोहन किंवा दुसरं कोणी का आक्षेप घेईल?

(अजयला हे कारण अगदीच पटले नाही. उलट त्याला प्रियाचा राग आला.) आणि एवढे बोलून त्या दोघांनी फोन ठेवला.

त्यानंतर अचानक अजय प्रियाशी तुटक वागू लागला. तिला फोन करणे, मेसेज करणे, हे सगळ अचानक बंद झालं. प्रियाला त्याचे हे वागणे खटकले.

प्रिया – (स्वतःशीच....) अजय अचानक अस का बरं वागू लागला ? मी काही चुकीचे तर बोलून गेले नाही ना त्याला? तिला थोडं वाईट वटू लागलं. गेले काही दिवस ज्या आपुलकीने अजय तिच्याशी बोलत होता ते सगळच अस अचानक बंद झालं होत. सतत अजयशी बोलून प्रियाला त्याची थोडी सवय लागायला सुरुवात झाली होती.

तिला या गोष्टीचा राग येत होता. तिला का कोण जाणे पण अजयचं असं अचानक तुटक वागणं त्रास देऊ लागलं होत. पण सगळ्यात जास्त तिला स्वतःचा राग येत होता, कि ज्या गोष्टीपासून ती लांब जात होती. ती म्हणजे, ‘भावनिक जोड’ तेच व्हायला सुरुवात झाली होती. आणि म्हणूनच तिने अजयसोबत बोलण बंद करण्याचा निर्णय घेतला.

पण इकडे अजयच्या मनात काय चालू होत? त्याला अचानक असे वागून नक्की काय सध्य करायचं होतं? याचा थांग तर मला ही लागत नाहीये.

 

 जर आयुष्यात पुढे कधी अजयने प्रियाशी संपर्क केला तर कथेचा पुढचा भाग नक्की प्रकाशित केला जाईल.

 


पण.... संवाद मात्र अपूर्णच राहिला.

 

सोमवार, २० सप्टेंबर, २०२१

गंपू आला रे..



 दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आम्ही सगळे चुलत भाऊबहीण, सगळे काका-काकू आमच्या कोंकणातल्या आजी-आजोबांच्या घरी गणेशाच्या उत्सवानिमित्त तब्बल पाच दिवसांसाठी एकत्र आलो... पूर्ण वर्षभराने एकदा एवढ्या दिवसांची सुट्टी काढून आम्ही सगळे एकत्र सण साजरा करण्यासाठी जमतो.

प्रचंड धमाल, मस्ती, आई आणि काकूंनी बनवलेले मोदक, आदल्या दिवशी काका आणि दादा, ताई सगळ्यांसोबत रात्री मखर बनवायची लगबग हे सगळं करताना वर्षभराची कामाची दग दग, टेन्शन सगळं भरून निघाल्यासारखं वाटतं.

पुढचे पाच दिवस आमचे एकत्र कुटुंबात खूप जास्त भारी जातात... आम्ही सगळे बाप्पाची आतुरतेने वाट बघत असतो. एवढी की मेसेज ग्रुपवर आधीपासूनच आमच्या चर्चा सुरू असतात. यावर्षी कोणतं डेकोरेशन करायचं? कोणी कोणते कपडे घालायचे? पाच दिवस काय काय करायचे? काय काय  खाऊ बनवायचा?
जागरणाच्या वेळी कोणते खेळ खेळायचे....या सगळ्याची यादी आधीच ठरलेली असते.

आमच्या घरात सालाबादप्रमाणे जगरणाच्या एका रात्री एक सोंगट्यांचा खेळ खेळला जातो. या खेळात दोन टीम असतात. एका टीमचे कॅप्टन आजोबा असतात आणि दुसऱ्या टीमची कॅप्टन आमची लाडकी आजी असते. आणि आम्ही सगळे लहानमोठे दोन टीममध्ये विभागून हा जुना खेळ खेळतो.
दुसऱ्या दिवशी आताचे नवीन गेम्स खेळले जातात.
तिसऱ्या दिवशी नवीन खाऊ बनवला जातो.
अश्याप्रकारे आमचं पाच दिवसाचे जागरण अगदी नियोजनबद्ध चालतं.
एकदा सकाळ सकाळ आजी आम्हाला सगळ्यांना घेऊन चुलीपाशी बसली होती. नीलम ताईला चुलीवरचं जेवण शिकवता शिकवता ती आम्हाला गरम गरम चुलीवरची भाकरी आणि पिठलं खाऊ घालत होती.

गौरव दादा आणि बंटी दादा आजोबांसोबत मागच्यादारात गोठ्यात गाईची आणि आमची बैलजोडी म्हणजेच  जय विरुची जोडी याना अंघोळ घालत होते.
चिनू आणि रोहन यांच्यावर दुर्वा, फुले हे सगळं गोळा करून आणण्याची जबाबदारी होती.
त्यानंतर हे सगळं आवरून, अंघोळ आटपून आम्ही सगळे बाप्पाच्या आरतीला जमा झालो.
आरतीनंतर प्रसाद कोणी वाटायचा यावरूनही कधीकधी लहानग्यांची झुंबड उडते.
नंतर प्रसाद घेऊन झाल्यावर घरातले सगळे एकत्र जेवायला बसतात.
असच जेवता जेवता गप्पागोष्टी चालू असताना
आमच्या लहानग्या चिनूने आजोबांना एक प्रश्न विचारला....

चिनू- आजोबा बाप्पा आपल्या घरी येतो , एवढे दिवस रहातो मग तो येताना त्याची बॅग का आणत नाही?
तो ब्रश सुद्धा करत नाही. त्याला त्याचे आई बाबा ओरडणार नाहित का?
आणि तो कुठून येतो आपल्याकडे?
तिचे असे खुपसरे प्रश्न ऐकून एक एक जण तिला पटेल असे उत्तर देऊ लागले.

असंच प्रश्नउत्तरांमधून अजून एक प्रश्न आला...
गणपती आपल्याकडे यायची प्रथा कशी पडली?
काहीजण त्यावर अनेक उत्तरं देऊ लागले.
अनेक कथा, अनेक रूढी यांचे संदर्भ देऊ लागले.

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा सामाजिक गणेशोत्सव कसा हळू हळू वायक्तिक होऊन गेला. लोकमान्य टिळकांमुळे गणेशोत्सव देशातच नव्हेतर परदेशात ही प्रसिद्ध झाला.

पण हा एकमेव असा देव आहे जो प्रत्येकाला स्वतःचा वाटतो.
माझा बाप्पा बोलताना जी आपुलकी वाटते ते काही औरच समाधान आहे.

घरात गणपती आणल्याने ते घरातील सर्व अडथळे दूर करतात.
भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी... ऑगस्ट, सप्टेंबर या काळात गणेश चतुर्थी येते.
एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला.
असे काही दाखले पुराणांमध्ये आढळतात. मात्र, घरगुती गणेश पूजनाची सुरुवात नेमकी कधीपासून झाली, याबाबत महाभारत काळाचा संदर्भ दिला जातो.

व्यासमुनींच्या मुखातून बाहेर पडणारे एक अन एक शब्द लिहून काढण्याची जबाबदारी भगवान गणेश यांनी घेतली होती.
महाभारत लेखन सुरू झाले. हा काळ बराच मोठा होता.
संपूर्ण महाभारत कथा समजून, लिहून घेण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटला, असे सांगितले जाते.

कित्येक दिवस एकाच ठिकाणी बसल्यामुळे गणपतीचे शरीर आखडून गेले. गणपतीच्या शरीरातील उष्णताही वाढायला लागली. वाढत जाणाऱ्या उष्णतेवर उपाय म्हणून गणपतीच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला. त्याला टणकपणा येऊन त्याने गणरायाच्या मूर्तीचा आकार घेतला. महाभारताची कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर ही माती झटकून विसर्जित करण्यात आली. तेव्हापासून महाभारताचा लेखक म्हणून गणपतीचा सन्मान करण्यासाठी गणपतीची मातीची मूर्ती घडवून तिचे पूजन करण्याची परंपरा सुरू झाली, अशीही एक कथा सांगितली जाते.
असे आम्हाला सदा काकानी सांगितले. सदाकाका म्हणजे आमचा सगळ्यांचा धाकटा काका... गौरव दादहून फक्त पाच ते सहा वर्षांनी मोठा.... पण फारचं अध्यात्मिक बुआ....


कधीतरी आम्हालाही घेऊन बसतो तो... सुरवातीचा वेळ मस्त जातो काहीतरी नवीन आणि अचंबित असे सांगत असतो तो पण; कधी कधी फारचं कंटाळा येतो... त्याच्या गोष्टी प्रवचन वाटू लागतात. पण त्याचं वाचन आणि अध्यात्माशी जवळीकता बघून भारी वाटतं.

बघता बघता संध्याकाळ झाली गणपती विसर्जनासाठी सगळे तयार होऊ लागले...  थोड्याच वेळाने बाप्पा निघाले. मिरवणूक विसर्जन तलावापर्यंत पोचेस्तोवर संध्याकाळचा काळोख झाला आणि मला पहिल्या दिवसाची आठवण झाली. आजीने आम्हाला सांगितले होते की," अरे पोरांनो, बाहेर जाताय पण; वर त्या पांढऱ्या ठिपक्याला पाहू नका बरं.... वर चंद्राला न बघताच कुठे फिरायचं ते फिरा"

असे का ?
हे मी आजीला विचारायला गेले... तर तिने मला असे सांगितले," एकदा गणपती बाप्पा त्यांचे आवडीचे मोदक खाऊन त्यांचे वाहन म्हणजे उंदिर, याच्या पाठीवरून जात होते. वाटेत त्याला साप दिसल्याने उंदीरमामा घाबरला आणि मध्येच थांबला त्यामुळे गणपती बाप्पा त्याच्या पाठीवरून खाली पडले.  आणि त्यांचे पोट फाटून सारे मोदक खाली पडले. बाप्पाने ते सारे मोदक पुन्हा पोटात टाकले आणि आपले पोट त्या सापाने बांधून टाकले. हे पाहून आकाशातील चंद्र हसू लागला...

गणपतीला राग आला आणि तुझे चतुर्थीला कोणीच दर्शन करणार नाही असा चंद्राला शाप दिला." तेव्हापासून त्याचे दर्शन कारणे वर्ज्य मानले जाते.

आल्यापासून गणेशोत्सवाच्या इतक्या भन्नाट कथा ऐकून मी बाबांना विचारले, "काय ओ बाबा, हे सगळं खरं आहे का?",  त्यावर बाबांनी मला सांगितले की बिश्वास ठेवला तर सगळं खरं आहे.
अश्या गणपतीच्या अनेक कथा, दंतकथा प्रचलित आहेत.


तुमच्या आजी-आजोबांनी, वाडीलधाऱ्यांनी, शाळेत , कोणी काय काय कथा सांगितल्या आहेत हे मला कमेंटमध्ये कळवा.

गणपती बाप्पा मोरया।
पुढच्यावर्षी लवकर या।

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

ये रे घना.

    ये रे घना.



काहीश्या उशिराने का होईना; पण तो आला आणि सगळ्यांना सुखावून गेला.

शाळा संपली आणि नवीन नवीन कॉलेज सुरु झालं. आपलं देखील एखाद्या हिंदी चित्रपटासारखं एकदम फिम्ली कॉलेज असावं असे मला वाटू लागले. माझा स्वभाव थोडा शांतच, म्हणून नव-नवीन मित्रमैत्रिणी बनवायला मला थोडं जड जात होतं; पण माझे क्लासमेट्स खूप मस्त होते. लवकरच आमचा ग्रुप तयार झाला.

माझ्या शांत स्वभावामुळे लेक्चर बुडवून कॅन्टीनमध्ये मज्जा- मस्करी करत असताना मोस्टली मीच त्यांची टार्गेट असायचे. त्यावेळी थोडसं ऑड वाटायचं.... बट ये तो मस्तीकी पाठशाला है ना. इतना एन्जॉयमेंट तो चालता ही है.. असा विचार करून मीही त्यांच्यात हळूहळू सामील व्हायला लागले.

जून-जुलै महिना आला. पावसाचे दिवस सुरु झाले. तशी या पावसाला  खूप टोपण नावं आहेत. काहींसाठी तो वैतागवाणा, चिखल करणारा, सगळीकडे रोगराई पसरवणारा, घाण करणारा पाऊस असतो.

पण पाऊसवेडी मी, माझ्या दृष्टीकोनातून तो चिंब भिजवणारा सुखद ओला स्पर्श आहे. 

म्हणजे त्याच्या नुसतं बरसण्यानेही माझं मन सुखावलं जातं . पावसाच्या गारव्यात मस्तपैकी हिरवळ बघत बाहेर फिरायला जाणं म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच. मला कधीच तो त्रासदायक, घाणेरडा वाटलाच नाही. पाऊस  ईश्वराचाच अवतार आहे. नाहीतर, मनाच्या आत स्पर्श करण्याची ताकद आणखी कोणामध्ये आहे? ही किमया फक्त पाऊसच करू शकतो.  

असचं एके दिवशी लेक्चर संपवून आम्ही सगळे कॉलेजमागच्या टेकडीवर फिरायला गेलो. अर्ध्या वाटेतच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. क्षणातच टपोऱ्या थेंबांचा ताडताड वर्षाव सुरु झाला. बघता बघता त्याच्या जलधारा वाढू लागल्या. काहींकडे छत्री, रेनकोट, विंडचीटर असून सुद्धा कोणीच ते सॅक मधून बाहेर काढले नाही. सगळ्यांनाच तो हवाहवासा वाटत होता. एरवी असा पाऊस आला की जो तो घरात घुसतो, दुकानांचा, हॉटेलांचा आसरा घेतो. आज मात्र सगळेच बेभान होऊन भिजू लागले. भोवताल पाऊसमय झाला होता. मी मित्रमंडळींकडे पहिले आम्ही सगळेच पावसात चिंब भिजलो होतो.  म्हणजे अगदी नाकाच्या शेंड्यांवरून, हनुवटीवरून पावसाचे थेंब सरसर अंगावरून खाली उतरत होते. ते दृश्य  मनाला आनंद देत होते. पावसाच्या त्या शीतलस्पर्शाने जीव सुखावला होता. 

एरवी ओसाड दिसणारी ही टेकडी जिच्या उंच टोकावर गणपतीचं मंदिर आहे. जे कॉलेजमधूनसुद्धा सहज दिसायचे तेच मंदिर आता हिरव्यागार घट्ट झाडांमध्ये लपून गेले होते. तिथवर जाणारा रस्तादेखील आता कठीण आणि घसरट झाला होता. तरीही आम्ही सगळे त्या मंदिरात गेलो. 

मंदिरच्या आवारात पालापाचोळा विखुरला होता. म्हणून आम्ही सगळेजण  मिळून तो साफ करू लागलो. सगळा कचरा एकत्र एका जागी जमा करून ठेवला आणि पुन्हा सगळ्यांची दंगा मस्ती सुरु झाली.
एखाद्या अवखळ मुलाप्रमाणे पाऊस इकडेतिकडे वाऱ्यासोबत हुंदडत होता. आम्ही सगळेदेखील अगदी लहान मुलांसारखे त्याच्या अवखळपणात सामील होऊन पावसात खेळू लागलो. 

आमचा आवाज ऐकून मंदिरातले पुजारी आजोबा  बाहेर आले आणि काहीश्या ओरडण्याच्या स्वरातच ते आम्हाला म्हणाले, ‘काय रे पोरांनो किती तो तुमचा कल्ला?, आज इकडे कशी वाट चुकली म्हणायची तुमची?, आज कॉलेजला दांडी मारली वाटतं?’
असे सगळे प्रश्न विचारताना त्यांची नजर आजूबाजूला मंदिराच्या परिसरावर पडली आणि ते म्हणाले,’पोरांनो तुम्ही तर आवार पूर्ण स्वच्छ केलात. या आता आत. पुरे झालं तुमचं भिजणं.’ 

आम्ही सगळे मंदिराच्या ओटीवर जाऊन विसावलो. पुजारी आजोबा गाभाऱ्यातून प्रसाद आणत म्हणाले, ‘ अरे मुलांनो आज तुम्ही माझं बरचसं काम हलकं केलत. नाहीतर या वाऱ्या आणि पावसामुळे रोज प्रचंड कचरा आवारात जमा होतो आणि तो केर कचरा साफ करताना माझी पूर्ण दमछाक होते.

मंदिराच्या ओटीवर  बसलेले असताना सगळ्यांच्या गप्पा गोष्टी रंगल्या. कोण दंतकथा सांगत होता. कोण त्यांनी अनुभवलेले निरनिराळे अनुभव संगत होते तर काहीजण उगाचच टिंगलटवाळ्या करत होते. 

माझे अर्धे लक्ष मात्र बाहेर पडणाऱ्या पावसाकडे होते. त्या उंच कोरड्या टेकडीवर हिरवी शाल पांघरावी तश्याच हिरव्या झाडांनी, रोपट्यांनी, वेलींनी आपले जाळे पसरवले होते. सगळी झाडे शेंड्यांपासून मुळांपर्यंत पाण्याने निथळत होती. दूरवर पसरलेल्या धुक्यामुळे सगळं अस्पष्ट दिसत होतं. आभाळभर पाऊस पाऊस होता. पूर्ण टेकडीवर जणू ढगच खाली उतरलेत की काय असे भासत होते. नुकत्याच सुरु झालेल्या पावसामुळे बऱ्याचश्या झाडांना नवीन पालवी फुटली होती. निसर्गाचा हा अविष्कार पाहून खरच आवाक व्हायला होतं.

हे सगळं पहाण्यात मी एवढी मग्न झाले होते की वेळेचं आणि भुकेचं भानच राहिलं नाही. खरं तर तिकडे पोहचेपर्यंत सगळ्यांनाच भूक लागली होती. तरी पुजारी आजोबांनी दिलेल्या प्रसादामुळे पोटाला थोडा आधार तर मिळाला होता; पण आता मात्र सगळ्यांच्याच पोटात कावळे ओरडू लागले होते. तेवढ्यात कोणीतरी म्हणाले, ‘ चला भूक लागली आहे. आता खाली उतरून पहिले पेटपूजा करायला हावी. म्हणूनच जास्त वेळ न दवडता आम्ही सगळे परतीला निघालो.

त्यानंतर आम्ही सगळे पावसात चिंब भिजून, कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये आलो. बाहेर मस्त पाऊस पडत होता. कॅन्टीनमधल्या हरी काकांनी बनवलेल्या गरमा गरम आल्याच्या चहाचा सुगंध सगळीकडे पसरला होता. म्हणूनच सगळ्यांना चहा आणि काहीतरी गरम गरम खायची इच्छा झाली. तेवढ्यात कोणीतरी म्हटलं,  'अरे, बाहर इतनी अच्छी बारीश और इस बारीशमे पकोडे नाही खाये तो क्या खाक मजा आयेगा'. अश्याप्रकारे चहा आणि कांदा भजी मागवून त्यावर सगळ्यांनी मनसोक्त ताव मारला.

(ते दिवस आठवून खरचं खूप भारी वाटतं. बाहेर पाऊस सोबतीला गरमा गरम चहा, कांदाभजी आणि मित्र मैत्रिणींसोबत दिखुलास गप्पा.... आऽऽ हाऽऽऽ... माहोल..)

संध्याकाळ झाली होती. कॅन्टीन मध्ये टिंगलटवाळ्या करून झाल्यानंतर आम्ही सगळे आपापल्या घरी जायला निघालो. सगळ्यांना सी यु टुमारो म्हणून निरोप घेतला आणि मी घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आता मी एकटी होते आणि जोडीला होता माझा रिमझिम बरसणारा पाऊस.

थोडं अंतर कापल्यावर, थोडा शांत आणि कमी रहदारीच रस्ता सुरु झाला. आजूबाजूला हिरव्यागार शेतात शेतकरी पिकांची लावणी करत होते. वाऱ्यावर डोलणारी पिकं जणू त्याच्या इशाऱ्यावरच नाचत आहेत की काय असे भासत होते. लांब गेलेले पक्षी आपआपल्या घरट्याकडे परतले. थंडीने कुडकुडणाऱ्या आपल्या पिल्लांना पावसात भिजलेले पंख झटकून कुशीत घेतले. त्यांच्या चोचीत प्रेमाने घास भरवला.

नेहमी संध्याकाळ झाली की आकाशात सारे ढग रंगपंचमी खेळत आहेत की काय असे भासायचे पण आज मात्र असे काहीच नव्हते. साऱ्या रंगांची जागा आज काळसर रंगाने घेतली घेतली होती आणि अश्या ढगाळ वातावरणामुळे रात्रीआधीच अंधार दाटू लागला होता.

गेले दहा मिनिटे मी हे सारं शांत एकाबाजूला उभी राहून पाहत होते.

वाऱ्यासोबत पावसाच्या त्या रिमझिम जलधारांचा अंगाला स्पर्श होताच; मन अगदीच शहारून उठलं. परमेश्वराने बनवलेल्या निसर्गाच्या अभूतपूर्व अश्या या पाऊसरुपी कारंज्याची कल्पनाच किती भन्नाट आहे याचा अनुभव घेत घेत मी पुढे पुढे घराच्या दिशेने चालू लागले.

नेहमी घरापासून माझं कॉलेज एवढ्या लांब का आहे?.. अशी चीड चीड करणारी मी, आज तोच रस्ता मला संपूच नये असे वाटत होते.

इतर वेळी स्वच्छता आणि टापटीपपणाचा कळस करणारी मी.. चक्क पावसामुळे तयार झालेल्या डबक्यात उडी मारून चहु बाजूला पसरणाऱ्या पाण्यातसुद्धा माझा आनंद मिळवत होते. बघता बघता घर जवळ आलं. तेवढ्यात एका मैत्रिणीचा फोन आला. तिने सांगितलं की सगळ्यांनी मिळून पुन्हा  पावसात लांब कुठेतरी फिरायला जायचं ठरवलं आहे आणि तुला हि आमच्यासोबत यायचं आहे. मी क्षणाचाही विलंब करता होकार दिला आणि अश्याप्रकारे पुन्हा एकदा आमचं रेनी पिकनिक अरेंज करायचं ठरलं होतं.

आणि नेहमीप्रमाणेच खट्याळ पावसाची नेमकी ऐनवेळेला हुलाहूल सुरु झाली. पुढचे काही दिवस पावसाचे असेच चालू होते. आकाशात काळे ढग जमा झाले की आशा वाटायची की  आता पाऊस पडेल, ढगाळ वातावरणामुळे हवेतील उष्मा कमी होऊन आता त्याच्या थंडगार सरी बरसावून तो सगळ्यांना सुखावेल; पण तेवढ्यातच कडकडीत उन पडायचं आणि पण पल्लवित झालेल्या अशा मावळून जायच्या.

गेल्या काही दिवसांपासून जमा होणाऱ्या ढगांनी हुलकावणी दिल्याने अजूनही आम्ही सगळे पावसाची प्रतीक्षा करत होतो; पण पाऊस मात्र काही केल्या पडत नव्हता. जणू पावसाने कुठेतरी दडी मारली आणि आमच्या सगळ्यांचाच हिरमोड झाला. त्यादिवसापासून आजपर्यंत सगळेच पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत.

त्याच्यासोबत मस्त एन्जॉय करण्याचे प्लान्स सुरु असतानाच न जाणो का; तो अचानक हिरमुसला आणि ढगांच्या आड जाऊन लपून बसला. त्यादिवसापासून त्याला प्रत्येक जण साद घालतोय.

पावसाच्या रुसण्यामुळे आमची रेनी पिकनिक लांबली याच दुःख नाही पण; त्याच्या अश्या अचानक जाण्यामुळे शेतकरी राजाचं झालेलं नुकसान याचं दुःख जास्त आहे.सुरवातीच्या पावसामुळे शेती मशागतीच्या कामांनी  वेग घेतला होता. बळीराजाच्या हाकेला प्रतिसाद देऊन तो येतो खरा; पण अगदी चटकन येतो आणि आल्या पावली पटकन निघूनही जातो.
अरे पावसा, या पृथ्वीवर जन्माला आलेल्या मनुष्य प्राण्यांसाठी अन्नाची व्यवस्था करण्याकरता शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यावर रुसू नकोस. त्याचे शेत फक्त एक जमिनीचा तुकडा नसून, त्याचे सर्वस्व आहे. एखाद्या मुलाचे पालनपोषण करतात, त्याच पद्धतीने तो जमिनीची मशागत करून तिला सुपीक बनवतो. त्याचे जीवन इतरांपेक्षा कठीण आहे. तो तुझ्यावर अवलंबून आहे रे पावसा. तो तुझ्या वाटेकडे टक लावून पाहतो आहे.

अरे पावसा, तू रिमझिम बरसून दिलेल्या या सुखद आनंदासाठी मी तुझी आभारी आहे.

वीज, पाणी, अन्न अश्या अनेक गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत रे..शेतकरी आणि पाण्यातील जलजीवनासाठी तर तू वरदान आहेस. त्यामुळे आता सगळ्यांनाच प्रतीक्षा लागली आहे ती धो धो कोसळणाऱ्या पावसाची. पावसाचे आगमन पृथ्वीवरील सर्व जीवांच्या आनंदाची गुरुकिल्ली आहे.

का रागावलाय तो? कधी येणार? उकाड्याने हैराण झालेल्या सगळ्यांनाच थंडगार वातावरणाची ओढ लागली आहे. सर्वांचेच डोळे आता त्याच्या वाटेकडे लागलेत.
तर मग प्लीज, रुसवा सोड आणि ये रे ये रे पावसा!

आणि नुसता येऊ नकोस तर, "पाऊस आला मोठा, नाही सुखसमृद्धीला तोटा" याची प्रचीती देऊन जा रे बाबा!







सोमवार, ५ जुलै, २०२१

सखी

 

दोघी मैत्रिणी.





मैत्रीची १७ वर्षे.

होय, १७ वर्षं हा आमच्या मैत्रीचा खूप मोठा काळ आहे.

आरती आणि मी गेली सतरा वर्षं आम्ही एकमेकींच्या राशीला लागलोय. सहावीत असताना हिने माझ्या शाळेत प्रवेश घेतला. थेट कर्जत वरून ती, मी ज्या शाळेत लहानपणापासून शिकत होते त्या माझ्या शाळेत ती आली होती.

माझ्या शेजारच्या बाकावर बसणाऱ्या रष्मिजवळ तिला बसायला सांगितलं होत. बाकीच्या मुलींप्रमाणेच ती काही खास नव्हती. पण का कोण जाणे रष्मिशेजारी ती बसलेली, तिच्याशी होत चाललेली आरतीची मैत्री मला खटकू लागली होती. तसं बघायला गेलं तर आमचं अस काही बोलणं सुद्धा झालं नव्हत. तरीही तिने माझ्याशी मैत्री करावी असे मला वाटे.

भगवंत खूप दयाळू आहे. एकेदिवशी ती स्वतःहून माझ्याशी बोलायला आली. त्या दिवशी जवळपास दिवसभर आमच्या गप्पा सुरु होत्या. त्या दिवसात अनेकवेळा वर्गात शिक्षक शिकवताना आम्हाला ओरडा भेटला होता.

आणि बसऽऽऽ तो एक दिवस होता आणि आजचा एक दिवस आहे.... शाळेतल्या हक्काच्या एकमेव मैत्रिणीपासून ते तिच्या लग्नात हक्काच्या करवली पर्यंत तिने माझी आणि मी तिची साथ कधीच सोडली नाही.  

शाळेत उठता बसता आम्ही एकमेकींना, तिला मी आणि मला ती लागायची.

तिच्या घरापासून शाळा जवळ होती पण; तरीही उलट फिरून, मी नेहमी उशीर करते हे माहिती असून सुद्धा माझ्या घरी येऊन माझ्यासोबत नेहमी शाळेत उशिरा जाणाऱ्या आम्ही,

जाता जाता उशीर का झाला याची खोटी खोटी करणं तयार करणाऱ्या आम्ही दोघी, मी माझ्या सायकल वरून तिला जवळपास नेहमीच पडते हे माहिती असूनसुद्धा ती डबलसीट बसून फिरणाऱ्या आम्ही,

शाळेत बाकी मुली सास-बहुच्या गप्पा मारत असताना... खालच्या वर्गातल्या लहान लहान मुलांमध्ये रमणाऱ्या आम्ही दोघी,

शाळेत चित्रकला, निबंध, हस्ताक्षर, रांगोळी, लेझीम, अश्या अनेक स्पर्धांमध्ये पहिला आणि दुसरा नंबर आधीच बुक करणाऱ्या आम्ही दोघी, कधी आयुष्यभरासाठी मैत्रिणी झालो हे समजलच नाही.

शाळेत लहाना मोठ्यांपासून... शिक्षकांपासून.... प्रध्यापाकांपासून ते शाळेतल्या पिऊन पर्यंत आमची जोडी प्रसिद्ध होती. अहो, एवढच काय बाकीच्या शाळांमध्ये सुद्धा सगळे आम्हा दोघींना एकत्रच ओळखत होते.

आता तर तिला माझ्या घरात माझ्याहूनही जास्त प्रेम करणारे लोकं आहेत. माझी आई तर पावलो पावली मला तिचं उदाहरण देत असते. (आरती अशी, आरतीने अस केलं, सुधारा जरा... आरती बघ आणि तू बघ... असं बरंच काही) आरती आली की मला सुद्धा भाव देत नाहीत आमच्या घरात. पण का कोण जाणे याचं मला कधीच वाईट वाटलं नाही.

तिच्या घरात तर लांब लांबच्या नातेवाईकांना सुद्धा मी माहितीये. जरी मी त्यांना ओळखत नसले तरीही.

 

हे सगळं पाहून मला यावर १००% खात्री पटली की, “ जेव्हा तुम्ही खतरनाक पुण्यवान असता तेव्हा तुम्हाला अशक्य सुंदर आणि प्रेमळ मैत्रीण मिळते आणि कमालीची गोष्ट म्हणजे एकमेकींच्या घरात त्या दोघींना त्यांच्यापेक्षाही जास्त प्रेम आणि माया मिळते.”

 

 

 

पुढे शाळा संपली. मी माझ्या पुढच्या शिक्षणासाठी बाहेर गेले. आम्हाला वाटलं आता आमची मैत्री विरळ होईल. मला नवीन मित्रपरिवार भेटला. तीही इतरांमध्ये रामू लागली; पण काही वर्षांनतर पुन्हा एकत्र आल्यावर मला असं समजलं की तिच्या नवीन मित्र मैत्रिणींमध्ये मी त्यांना न भेटता देखील आधीच सगळ्यांना माहिती आहे.

सतरा वर्ष्यांच्या या प्रवासात आम्हाला खूप हितचिंतक लाभले आणि काही अशीही लोकं भेटली जे आमच्यात गैरसमज आणि वाद निर्माण करतील.

हे सगळ अनुभवल्यानंतर आज आमची मैत्री खरचं खूप घट्ट झाली आहे.

मी खरचं खूप भाग्यवंत आहे, मला तुझ्यासारखी मैत्रीण लाभली.

हो हे खूपच खरं आहे की मला मित्र मैत्रिणी बनवता येत नाहीत. त्यामुळे आजपर्यंत तुझ्यासारखी मैत्रीण मला मिळाली नाही. कदाचित माझ्या आयुष्यातली मैत्रीची गरज तूच पूर्ण केलीस आणि म्हणूनच शाळेत असताना तू घेतलेल्या पुढाकारामुळे आज आपण हाडाच्या मैत्रिणी आहोत.


माझ्या रडक्या, बडबड्या आणि खूप मायाळू मैत्रिणीला या मैत्रिणीकडून प्रचंड प्रेम.

आपल्या मैत्रीला उदंड आयुष्य लाभो.

सोमवार, १४ जून, २०२१

'ती'च्या आठवणीत


समुद्रकिनारी सोसाट्याचा वारा सुटला होता. तनय आणि त्याचे सगळे मित्र मैत्रिणी सीफेस वर फिरायला आले होते. ढग दाटून आले होते. पावसाने काळोख केला होता.

पाऊस सुरु झाला की सीफेसवर मित्रांसोबत कल्ला करण्यात जी मजा आहे ती कुठेच नाही असे तनयला वाटे. पण एकटं निवांत किनाऱ्यावर बसण्यात जो आनंद आहे तोही काही कमी नाहीये. त्यातपण जर ती सोबत असेल तर बातच और.

असा सगळा विचार करत तनय एक टक क्षितिजाकडे पाहत मनोमन तिला आठवत होता. वाऱ्याची गार झुळूक हळूच समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांना स्पर्श करून तनयपर्यंत  पोचत होती. थेंब थेंब पाऊस पडू लागला. तनय ला तिची आठवण येत होती.

अश्यातच एकाने त्याची छेड काढलीच...

एक मित्र - काय रे तनय, तुझी ती कुठेय? आज नाही का ती सोबत तुझ्या?  कसं होणार तुझंं आता?

दुसरा मित्र - तिच्याशिवाय तर तुझं पानसुद्धा  हलायचं नाही ना.... 

एक मैत्रीण – कशाला त्याला चिडवताय रे?

ते सगळे मिळून त्याला चिडवायचे पण तनयला त्यांचा कधीच राग नाही आला.

उंच, सडपातळ, रंगाने ती जरी काळीसावळी असली तरी तिचा तो नखरा, तिचा तोरा काही औरच होता.

पाऊस, तनय आणि ती ....हे तनयचं आवडीचं समीकरण.

पाऊस पडायला लागला की तनयला तिची आठवण आल्याशिवाय राहत नसे. कारण गेल्याच पावसाळ्यात ती तनयला भेटली होती. कॉलेजमध्ये तनयला तिच्याशिवाय कोणी पहिले नाही असा एक दिवस नाही. तनयची आणि तिची जोडी त्याला फार आवडे.

समुद्रकिनाऱ्यावरच्या तुफान वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने तनयला बैचेन केलं. तिच्यासोबतच्या त्याच्या सगळ्या आठवणी एकदम ताज्या झाल्या.

तनय तिला घेऊन सीफेसवर यायचा. पावसासोबत सोसाट्याचा वारा सुटला की तनयला त्या वाऱ्याचा खूप राग यायचा. तो तिला त्याच्यापासून दूर नेईल की काय असे त्याला वाटायचे. म्हणून तो तिला घट्ट पकडून ठेवत असे. अश्या अनेक आठवणी जाग्या झाल्या.

ज्याने तिला त्याच्यापासून लांब केलं, तनयला त्याचा प्रचंड राग येत होता. पण आता त्याचा नाईलाज होता.

आता त्या फक्त आठवणी राहिल्या होत्या. त्याला आता तिच्याशिवाय राहणं भाग होत. त्याला गोष्टीचा राग येत होता ली शेवटी त्याला यंदाचा पावसाळा तिच्याशिवाय काढावा लागणार होता.

इतक्यात कोणीतरी त्याला मस्करीत म्हणालचं.. .अरे तनय आता बसं झालं.. आता नवीन विंडचीटर घे.

तनयला त्याचा सल्ला पटला आणि त्याने नाईलाजास्तव होकारार्थी मान हलवली.


हो.....

गेल्या वर्षी तनयच्या काकांनी त्याच्यासाठी त्याच्या आवडीची खास इम्पोर्टेड आणलेली “ती“, 

छत्री’’  क्लासरूम मधून कोणीतरी ढापली होती.

आणि म्हणून त्याला यावर्षी नवीन छत्री किंवा विंडचीटर घेण्यापलीकडे दुसरा मार्ग नव्हता.

 



शुक्रवार, ११ जून, २०२१

असे हे प्रेम (अंतिम भाग)

 फोनवरचंं प्रेम.... 

रवी – (त्याचा अत्यंत आवडता आवाज ऐकण्यासाठीची आतुरता आणि तिच्यावरचा राग या अश्या संमिश्र भावनेनेच तो म्हणाला...) हॅलो! मला थोडं बोलायचं आहे.

ईशाने तब्बल एका महिन्यानंतर रवीचा आवाज ऐकला होता. तो समोर असता तर घट्ट मिठी मारली असती. इतक्या आनंदात ती होती. पण तिने केलेल्या चुकीची जाणीवदेखील तिला होती. म्हणून तिने पुन्हा एकदा त्याची माफी मागितली.

इशा – सगळ्यात आधी मला माफ कर. मला माहिती आहे आपल्यात ठरलं होत की आपण काहीच लपवायचं नाही; पण तू माझ्यापासून दूर जाशील म्हणून मी तुला अविनाश बद्दल सांगितलं नव्हत.

रवी – (तिचा तो आवाज ऐकूनच त्याचा निम्मा राग गेला होता.) इशा ज्या कारणामुळे मी तुला माफ करावं अस तुला वाटतंय, खरतर त्या कारणामुळे मी तुझ्यावर कधीच रागावलो नव्हतो. तुझ्या आयुष्यात माझ्या आगोदर कोणीतरी होतं याचं वाईट मला वाटत नाहीये. तू ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीस याचं मला दुखः आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये, जर काही असेल तर ते आताच सांग. हे पहा तुझ्या या चुकीमुळे मला जे दुखः झालं ते नक्कीच माझ्या प्रेमाहून मोठं नाहीये.

इशा – रवीचं बोलणं ऐकून तिला दिलासा भेटला. तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होता; पण आपलं माणूस न गमावण्याचा आनंद जास्त होता.

त्या दोघांनीही गोष्टींचा गुंतागुंत सोडवून पुन्हा एकदा नव्याने नात्याला सुरुवात केली.

पुढच्या दोन वर्षांनंतर ईशाच ग्र्यॅजुएशन पूर्ण झालं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ती आता नाशिकला जाणार होती पुढचं शिक्षण पूर्ण करायला. तिने ही बातमी रवीला सांगितली. रवीच्या आनंदाला पारावार नव्हता. इशा आपल्याच शहरात येणार. ही गोष्ट त्याच्या मनाला एवढी सुखावत होती की गेले दोन तीन वर्ष तो तिच्यापासून एवढा लांब होता याचं लेश त्याच्या मनातून दूर कुठेतरी गेलं होत.

अखेर त्याचं लाँगडिसटंस नात संपून ते दोघे आता एकाच शहरात राहणार होते. जे काही मतभेद त्यांच्यात असलेल्या अंतरामुळे उद्भवत होते ते कमी होणार होते. आतापर्यंत ते दोघे एकमेकांना फक्त फोनवरून अनुभवायचे; पण आता ते सगळं बदलणार होत. ते दोघेही खूप खुश होते.

इशा नाशकात आली. रवी तिथे असल्यामुळे ईशाला स्थिरस्थावर व्हायला मदत झाली. तिचं कॉलेज सुरळीत चालू झालं. अनेक महिन्यांनंतर भेटणारे रवी इशा आता जवळपास रोजच भेटू लागले. त्यंना इतक्या वर्षांपसून जे पाहिजे होत ते सगळ घडत होत. हळू हळू ईशाची ओळख रवीच्या घरच्यांशी वाढू लागली. त्याचा मित्रपरिवार आता तिचाही झाला होता. ते दोघेही खूप खुश होते.

पण पुढे गोष्टी थोड्या बदलू लागल्या. रवीला त्याच्या कामामध्ये अडचणी येऊ लागल्या. रवीची चिडचिड वाढू लागली. तो तिला गृहीत धरू लागला आणि त्याचा परिणाम थेट यांच्या नात्यावर दिसू लागला. त्यांची भांडणे वाढू लागली. ईशाचा स्वभाव मुळातच थोडा रागीट होता हे तुम्हाला कथेच्या सुरवातीलाच समजले असेल. ती जेवढी रागीट होती तेवढीच हळवी होती. त्याच्या अश्या वागण्याचा तिला प्रचंड त्रास होऊ लागला. त्या भांडणांमुळे त्यांच्यात अंतर निर्माण झाले. एकाच शहरात राहूनदेखील ते क्वचितच भेटू लागले.

कधीकाळी ज्यांना एकमेकांशिवाय न बोलता करमत नसे, आता तेच दोघे फक्त कामापुरत बोलू लागले. भेटले तरी भांडणच. यांच्यात आलेला दुरावा आता इतरांना देखील जाणवू लागला होता. स्पष्टपणे दिसू लागला होता.

एके दिवशी रवी आणि इशा, रवीच्या एका नेहमीच्या मित्रासोबत गप्पा मारत चहा टोस्ट खात होते. बघता बघता गप्पांच्या ओघात कोणत्यातरी विषयावरून रवी आणि ईशाचे मतभेद होऊ लागले. वादाचं रुपांतर कडाक्याच्या भांडणात झालं. इशा रागाने तिथून निघून गेली. रवीनेही तिला थांबवलं नाही.

रवी आणि इशाच्या चांगल्या वाईट काळात तो सामील असायचा. त्याने रवी आणि इशाच एकमेकांवरच नितांत प्रेम पाहिलं होत. एकमेकांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या या जोडप्याच नात आजच्या घडीला या ठिकाणी येऊन ठेपलंय हे पाहून त्याला देखील ते पाहवले नाही.

 बराच वेळ झाला इशा परत आली नव्हती. तिचा फोन देखील लागत नव्हता. त्याने रवीला समजावलं आणि ते दोघेही ईशाला शोधायला निघाले. तिच्या मैत्रीणीना विचारून झालं, एक दोन ठिकाणी पाहून झालं; पण इशा तिथे नव्हती. त्याला आता तिची काळजी वाटू लागली होती. तेवढ्यात रवीच्या लक्षात आलं, इशा टेकडीवरच्या गणेश मंदिरातच असणार. ते दोघे लगबगीने तिथे पोचले आणि खरचं रवीचा अंदाज खरा ठरला, ती तिथेच होती.

तिला पाहून त्याच्या जीवात जीव आला आणि रवीला समोर बघून इशाचे डोळे पाणावले. त्यादोघांना पुन्हा एकदा कळून चुकलं की ते दोघे एकमेकांशिवाय नाहीच राहू शकत. त्याच क्षणी त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य एकमेकांसोबत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.

नंतर एक वर्षभरात त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल रीतसर घरी सांगायचं ठरवलं. तसं रवीच्या घरी कल्पना होतीच. त्याने इशाबद्दल घरी सांगितलं. घरी थोड तणावाच वातावरण निर्माण झालं रवीच्या वडिलांना हे मान्य नव्हत; पण रवी आणि इशा दोघेही ठाम होते. रवीने घरी बाबांना मानवायचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्याचे प्रयत्न यशस्वी झाले.

 पण अजून एक किल्ला लढवण बाकी होत. इशाच्या घरी तिची लहान बहिण आणि एक दोन जवळच्या मैत्रिणी सोडल्या तर कोणालाच रावीबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल माहिती नव्हत.

त्या दोघांनी ठरवूनच ही गोष्ट तिच्या घरच्यांपासून गुपित ठेवली होती. पण आता सांगण तर भाग होत. मोठ्या हिमतीने ईशाने आई वडिलांना रावीबद्दल घरी सांगितलं. ईशाचे आई वडील दोघेही या लग्नाला तयार नव्हते.

खूप मतभेद, खूप रडे, खूप भांडण या सगळ्यातून वाट काढत त्याचं नात लग्नाच्या उंबऱ्यात येऊन ठेपल. अखेरीस त्यांच्या मनासारखं घडत होत.

आणि ती वेळ आलीच.. त्यांच्या लग्नाचा दिवस.... देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, आई वडील आणि मित्रपरिवार यांच्या समवेत, त्यांच्या या सुखद आणि खडतर प्रवासाचे क्षण, असे सगळेजण आज रवी आणि इशाच्या गोड लग्नसोहळ्याचे साक्षीदार होते.

रवी आणि ईशाने एकमेकांना पाहिलं आणि गेली आठ वर्षे त्या दोघांच्या डोळ्यासमोरून तरळली. दोघांनाही भरून आलं. 

आठवर्षांपूर्वी एका राँग नंबरमुळे या दोन मनांची ओळख झाली होती. नियतीनेच त्या दोघांना एकमेकांसाठी निवडलं होत.आज त्या दोन वेगवेगळ्या प्रदेशातल्या वेगवेगळ्या व्यक्ती, ती दोन मनं एकत्र येणार होते.

चला तर मग रवी आणि इशा यांना भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊन आपली कथा इथेच संपवूया.



 समाप्तः

गुरुवार, १० जून, २०२१

असे हे प्रेम (भाग २)

 फोनवरचंं प्रेम.....

कालांतराने ईशाला या खोट्याच ओझ जड वाटायला लागलं. तिला तिची चूक काबुल करायची इच्छा तर होती पण तिला परिणामांची भीती होती. तिला वाटू लागले की जर हे सत्य रवीला समजले तर त्याला खूप वाईट वाटेल आणि तो माझ्यापासून लांब जाईल. त्यापेक्षा मीच त्याच्याशी बोलणार नाही जेणेकरून त्याला लागलेली माझी सवय तुटेल आणि त्याला माझ्यापासून लांब जाणं सोप होईल.

इच्छेविरुद्ध ती त्याच्याशी तुटक वागू लागली. नेहमीसारखं वेळ काढून बोलणं तिने कमी केलं. तिला देखील माहिती होत की या सगळ्यात रवीची काहीच चूक नाही तरी देखील त्याच्याशी असं वागून मी खूप वाईट करतीये हे तिला कळत होत.

त्याला असं दूर लोटणं तिला कठीण जात होत. पण सत्य लपवून खोटेपणाने जगणंसुद्धा तिला जमत नव्हत.

इकडे रवीला काहीच कळत नव्हत की इशा अशी का वागते. त्याचं काय चुकलंय की ती त्याला अशी दूर लोटतीये. तो सगळ्या परीने तीला विचारायचा, तीला समजवायचा प्रयत्न करत होता. ईशाला हे सगळ कळतही होत. झोपलेल्याला उठवू शकतो पण जो जागा आहे त्याला कसं काय उठवायचं? अशीच काहीशी ईशाची अवस्था होती. पण सत्य सांगण्याची हिम्मत तिच्यात नव्हती. ती रवीला गमावून बसेल याची भीती तिच्या मनात घर करून बसली होती. कारण ही गोष्ट, हे सत्य सांगायची वेळ मागे निघून गेली होती असे तिला वाटत होते.

बघता बघता एक वर्ष सरलं. ईशाला वाटलं होत; वेळ जाईल तशी त्यांची एकमेकांना लागलेली सवय सुटेल; पण तसं काहीच घडलं नाही.

जे घडत होत त्याचा दोघांनाही त्रास होत होता. ईशाच्या लाख प्रयात्नानीही तिला त्याच्यापासून लांब जाता येत नव्हत. तीला रावीशिवाय जगायलाच जमतच नव्हत; पण तिच्या खोटेपणासोबत आयुष्यात पुढे जाणदेखील शक्य नव्हत.

अखेर तिने त्याला खर काय ते सांगायचा निर्णय घेतला. सगळी हिम्मत गोळा करून तिने रवीला फोन केला.

इशा – हॅलो, थांब रवी... तू काही म्हणायच्या आत मला तुला काहीतरी खूप महत्वाच सांगायचय. जर मी हे आता बोलू शकले नाही तर पुन्हा मला जड जाईल सगळ सांगायला.

रवी – (थोडा घाबरून आणि गोंधळलेल्या स्तिथीत तिला विचारतो) इशा काय झालं? काय सांगायचं आहे तुला?

इशा – मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. गेले बरेच महिने... नव्हे वर्ष.... मला हे तुला सांगायचय.

तुला आठवतंय का मी तुला एकदा अविनाश बद्दल सांगत होते?

रवी- खर तर मला आठवत नाहीये. पण बोल ना, त्याचं काय?

इशा – तो.....त्याच....म्हणजे... मी सांगणारच होते तुला आधीच पण....

रवी – काय झालायं इशा? कोण अविनाश? आणि त्याचा काय संबंध इथे?

इशा – अविनाश वानखेडे. माझा वर्गमित्र. दहावीपासून आम्ही एकत्रच होतो. तो माझा खूप चांगला मित्र होता.

रवी – हऽऽ...बरं मग?

इशा - तू जेव्हा मला पहिल्यांदा फोन केला होतास त्याच्या काही महिन्यांपूर्वीच आमचं खूप मोठ भांडण झाल होत.

रवी – कशावरून? असलं भांडण?

इशा – कॉलेज मध्ये असताना सगळ्यांना वाटायचं की आम्ही एकत्र आहोत. पण तसं खरच काही नव्हत. खर सांगायचं झालं तर अविनाश माझ्यासाठी एका चांगल्या मित्राहून अधिक जवळचा होता. तो माझ्या आयुष्यातला महत्वाचा व्यक्ती होता. आमच्यात आगदीच प्रेम म्हणावं अस नव्हत; पण प्रत्येक सुख दुःखाचे आम्ही साथीदार बनलो होतो. रवी, मला चुकीच समजू नकोस.  

तुझ्यापासून हे सगळं लपवायचं नव्हत रे....पण माझा धीरच होत नव्हता.

(हे सगळ ऐकताना त्याच्या मनावर खोल घाव होत होते. तिचं बोलणं, तिचा एक अन एक शब्द त्याच्या मनाला काट्यासारखा बोचत होता. तरीही रवी ईशाच बोलणं शांतपणे ऐकत होता.)

इशा – रवी मी तुला अंधारात ठेवलं. मला माहिती आहे तुझा माझ्यावर असलेल्या विश्वासाला मी धक्का दिलायं. मला स्वतःला तुझ्यापासून हे लपवणं चूक वाटत होत म्हणून मी.....

(रवी तिचं बोलणं मध्येच थांबवतो.)

रवी – अच्छा, हे कारण होत तर तुझ माझ्याशी तुटकपणे वागण्याचं? गेला वर्षभर मी विचार करून थकलोय. माझ्याकडून काय चूक झालीये की तू अशी वागतेस?  इशा, मला खर तर काहीच सुचत नाहीये हे सगळ ऐकल्यानंतर..  मला आता काहीच बोलायचं नाही आहे. आपण नंतर बोलू. (एवढे बोलून रवी रागाने फोन ठेवतो)

त्यानंतर इशा बऱ्याचदा रवीशी बोलण्यचा प्रयत्न करते पण रवीला तिचा प्रचंड राग आलेला असतो. तो तिच्या कोणत्याच फोन आणि मेसेजचं उत्तर देत नाही.

असेच काही दिवस उलटून जातात. ईशाला झाल्या प्राराचा पश्चाताप होतो. ती सर्वतोपरी रवीला समजवायचा प्रयत्न करते; पण रवी अजूनही तिच्याशी बोलत नसतो. त्याला काही केल्या ईशाच हे खोट मान्य नसतं.

(एकट्याने हे दुःख पचवणे त्याला जड जात होत म्हणून न रहावता रवी ही गोष्ट आपल्या मित्राला सांगतो.)

रवी - आपण जिच्यावर जीवापाड प्रेम केलंय. जिच्याशी आयुष्यातल्या लहान-मोठ्या, अगदी सगळ्या गोष्टी सांगितल्या.. तिनेच आपल्याला अंधारात ठेवलं. मान्य आहे तो तिचा भूतकाळ आहे; पण या नात्यात येण्यापूर्वी आम्ही दोघांनी ठरवलं होत की कोणतीच गोष्ट एकमेकांपासून लपवायची नाही. मला या गोष्टीचा त्रास नाही की माझ्या आगोदर आणखी कोणी तिच्या आयुष्यात होतं; पण मला याच दुःख आहे की ती माझ्याशी खोट बोलली. जर ती हे खोट बोलू शकते तर आजवर तिने अश्या अनेक गोष्टी माझ्यापासून लपवल्या असतील. मला तिच्याशी यापुढे कधीच, कसलेच संबंध ठेवायची इच्छा नाहीये.

अश्विन (रवीचा मित्र) – रवी, तुला मी फक्त एकच प्रश्न विचारेन.... तुझ्याशी ती खोट बोलली, गोष्टी लपवल्या, तुला आधारात ठेवलं, सगळं मान्य आहे. तुझं तिच्यावर चिडणं हे देखील सहाजिक आहे आणि हो तू तिच्यावर रागावलाही पाहिजेस; पण हे सगळ करून तू तिच्याशिवाय राहू शकतोस का?

अश्विनचं बोलणं ऐकून रवी निशब्द झाला. रागात त्याला तिच्यावर असलेल्या जीवापाड प्रेमाची जाणीवच झाली नाही. पण ती जे वागली होती; ही गोष्ट काहीकेल्या त्याला पटतच नव्हती.

थोडं शांत होऊन, थोडा विचार करून, रवीने ईशाला फोन केला. एकेकाळी ज्या दोघांना एकमेकांशी बोलायला दिवस देखील पुरत नव्हता ते इशा आणि रवी गेला महिनाभर एकमेकांशी बोललेसुद्धा नव्हते.

रवीचं साधं नाव पाहून जिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक यायची, ती आज चातक पक्षापरी रवीच्या फोनची वाट बघत होती. तिने रवीचा फोन पहिल्या रिंग मध्येच उचलला, जणू ती या एका फोनचीच वाट पाहत होती.

 क्रमशः




त्याने तिला काय सांगण्यासाठी फोन केला असेल?  त्या दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं असेल? रवी ईशाला माफ करेल का? ईशाने ही गोष्ट लपवून चूक केलं का? की तिला वाटणारी भीती सहाजिक होती?

तुम्हाला काय वाटतंय हे नक्की मला कळवा. 

पुढे काय घडलं हे तुम्हाला सांगण्यासाठी  लवकरच कथेचा शेवट घेऊन येणार आहे.  

त्याचा अपूर्ण संवाद.

आज प्रिया ऑफिसमधून घरी आल्यावर, आवरून तिने फोन हातात घेतला. तिच्या ऑनलाईन अकाऊंटवर एक अनोळखी मेसेज होता. म्हणून आगोदर तिने एवढ लक्ष दिलं नाह...