दोघी मैत्रिणी.
मैत्रीची १७ वर्षे.
होय, १७ वर्षं हा आमच्या
मैत्रीचा खूप मोठा काळ आहे.
आरती आणि मी गेली सतरा
वर्षं आम्ही एकमेकींच्या राशीला लागलोय. सहावीत असताना हिने माझ्या शाळेत प्रवेश
घेतला. थेट कर्जत वरून ती, मी ज्या शाळेत लहानपणापासून शिकत होते त्या माझ्या शाळेत
ती आली होती.
माझ्या शेजारच्या बाकावर
बसणाऱ्या रष्मिजवळ तिला बसायला सांगितलं होत. बाकीच्या मुलींप्रमाणेच ती काही खास
नव्हती. पण का कोण जाणे रष्मिशेजारी ती बसलेली, तिच्याशी होत चाललेली आरतीची
मैत्री मला खटकू लागली होती. तसं बघायला गेलं तर आमचं अस काही बोलणं सुद्धा झालं
नव्हत. तरीही तिने माझ्याशी मैत्री करावी असे मला वाटे.
भगवंत खूप दयाळू आहे.
एकेदिवशी ती स्वतःहून माझ्याशी बोलायला आली. त्या दिवशी जवळपास दिवसभर आमच्या
गप्पा सुरु होत्या. त्या दिवसात अनेकवेळा वर्गात शिक्षक शिकवताना आम्हाला ओरडा
भेटला होता.
आणि बसऽऽऽ तो एक दिवस होता
आणि आजचा एक दिवस आहे.... शाळेतल्या हक्काच्या एकमेव मैत्रिणीपासून ते तिच्या
लग्नात हक्काच्या करवली पर्यंत तिने माझी आणि मी तिची साथ कधीच सोडली नाही.
शाळेत उठता बसता आम्ही
एकमेकींना, तिला मी आणि मला ती लागायची.
तिच्या घरापासून शाळा जवळ होती
पण; तरीही उलट फिरून, मी नेहमी उशीर करते हे माहिती असून सुद्धा माझ्या घरी येऊन
माझ्यासोबत नेहमी शाळेत उशिरा जाणाऱ्या आम्ही,
जाता जाता उशीर का झाला
याची खोटी खोटी करणं तयार करणाऱ्या आम्ही दोघी, मी माझ्या सायकल वरून तिला जवळपास
नेहमीच पडते हे माहिती असूनसुद्धा ती डबलसीट बसून फिरणाऱ्या आम्ही,
शाळेत बाकी मुली
सास-बहुच्या गप्पा मारत असताना... खालच्या वर्गातल्या लहान लहान मुलांमध्ये
रमणाऱ्या आम्ही दोघी,
शाळेत चित्रकला, निबंध,
हस्ताक्षर, रांगोळी, लेझीम, अश्या अनेक स्पर्धांमध्ये पहिला आणि दुसरा नंबर आधीच बुक
करणाऱ्या आम्ही दोघी, कधी आयुष्यभरासाठी मैत्रिणी झालो हे समजलच नाही.
शाळेत लहाना
मोठ्यांपासून... शिक्षकांपासून.... प्रध्यापाकांपासून ते शाळेतल्या पिऊन पर्यंत
आमची जोडी प्रसिद्ध होती. अहो, एवढच काय बाकीच्या शाळांमध्ये सुद्धा सगळे आम्हा
दोघींना एकत्रच ओळखत होते.
आता तर तिला माझ्या घरात
माझ्याहूनही जास्त प्रेम करणारे लोकं आहेत. माझी आई तर पावलो पावली मला तिचं
उदाहरण देत असते. (आरती अशी, आरतीने अस केलं, सुधारा जरा... आरती बघ आणि तू बघ...
असं बरंच काही) आरती आली की मला सुद्धा भाव देत नाहीत आमच्या घरात. पण का कोण जाणे
याचं मला कधीच वाईट वाटलं नाही.
तिच्या घरात तर लांब
लांबच्या नातेवाईकांना सुद्धा मी माहितीये. जरी मी त्यांना ओळखत नसले तरीही.
हे सगळं पाहून मला यावर
१००% खात्री पटली की, “ जेव्हा तुम्ही खतरनाक पुण्यवान असता तेव्हा तुम्हाला अशक्य
सुंदर आणि प्रेमळ मैत्रीण मिळते आणि कमालीची गोष्ट म्हणजे एकमेकींच्या घरात त्या
दोघींना त्यांच्यापेक्षाही जास्त प्रेम आणि माया मिळते.”
पुढे शाळा संपली. मी माझ्या
पुढच्या शिक्षणासाठी बाहेर गेले. आम्हाला वाटलं आता आमची मैत्री विरळ होईल. मला
नवीन मित्रपरिवार भेटला. तीही इतरांमध्ये रामू लागली; पण काही वर्षांनतर पुन्हा
एकत्र आल्यावर मला असं समजलं की तिच्या नवीन मित्र मैत्रिणींमध्ये मी त्यांना न
भेटता देखील आधीच सगळ्यांना माहिती आहे.
सतरा वर्ष्यांच्या या
प्रवासात आम्हाला खूप हितचिंतक लाभले आणि काही अशीही लोकं भेटली जे आमच्यात गैरसमज
आणि वाद निर्माण करतील.
हे सगळ अनुभवल्यानंतर आज
आमची मैत्री खरचं खूप घट्ट झाली आहे.
मी खरचं खूप भाग्यवंत आहे,
मला तुझ्यासारखी मैत्रीण लाभली.
हो हे खूपच खरं आहे की मला
मित्र मैत्रिणी बनवता येत नाहीत. त्यामुळे आजपर्यंत तुझ्यासारखी मैत्रीण मला
मिळाली नाही. कदाचित माझ्या आयुष्यातली मैत्रीची गरज तूच पूर्ण केलीस आणि म्हणूनच शाळेत
असताना तू घेतलेल्या पुढाकारामुळे आज आपण हाडाच्या मैत्रिणी आहोत.
माझ्या रडक्या, बडबड्या आणि
खूप मायाळू मैत्रिणीला या मैत्रिणीकडून प्रचंड प्रेम.
आपल्या मैत्रीला उदंड आयुष्य लाभो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा