अरे हरी तुला माहित आहे का आज घनश्याम अण्णा नाम्या गोसाव्याच्या दुकानावर काय सांगत होते....
हरी - तेच ना जे सगळ्यांना भुताच्या गोष्टी सांगत असतात ?
वसंत - हो बरोबर ओळखलंस बघ. पण आज ते जे सांगत होते ते अगदीच खर आहे.. माझी आजी पण आम्हाला ते सांगायची.
हरी - (वसंताचं बोलणं संपायच्या आत त्याला पुढचा प्रश्न विचारतो) बरं मग ? पुढे बोल लवकर. मला घरी जाऊन दप्तर भरून शाळेला निघायचंय !
वसंत - चालेल शाळेत भेटू. तिथेच सांगतो मी तुला.
(अस बोलून ते दोघे आपापल्या घरी निघून गेले)
आजूबाजूला हिरवे घनदाट जंगल आणि बरोबर त्या जंगलाच्या मधोमध मोजून शे-सव्वाशे घरं मिळून बनलेलं दिवाघर नावाचं गाव होतं. त्याच गावात राहणारे हे दोघे. हरी आणि वसंत. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. एके दिवशी त्या दोन लहानग्यांच्या कानावर एक गोष्ट पडते आणि बस्स सुरु होते आपली कथा...
(टनऽ टनऽऽ टनऽऽऽ टनऽऽऽऽ.. मधली सुट्टी झाली. वसंता कसाबसा एवढावेळ मनात ठेवलेली ती घनश्याम अण्णांनी सांगितलेली गोष्ट कधी एकदा हरीला सांगतोय याचाच विचार करत असताना हरी विचारतो...
हरी - काय रे वसंता काय सांगत होतास तू सकाळी ?
वसंता - अरे ते घनश्याम अण्णा म्हणे, तेऽऽऽ तीअडे टेकडीमागच्या डोंगरावर जिथे कोणीच जात नाही तिथे कुठल्यातरी देवीचं मंदिर आहे.
हरी – हा त्याचं काय मग ?
वसंता - अरे थांब पुढची गोष्ट तर त्याहून विचित्र आहे. तिथून म्हणे पौर्णिमेच्या दिवशी रात्र आणि पहाट याच्या मध्यात असंख्य घंटांचा घंटानाद होतो आणि तो घंटानाद इथे आपल्या गावापर्यंत ऐकू येतो.
हरी- अरे जर तिथे कोणीच जात नाही तर मग कोण त्या घंटा वाजवत असेल? कोणी त्या तिथे बांधल्या असतील?
असे असेल तर कशावरून तिथूनच तो आवाज येतो? कोणी जर घंटा वाजविली तरच हे शक्य आहे; नाहीतर हे शक्यच नाहीये.
आणि तिकडे कोणीच जात नही असे तू म्हणतोस तर तिथे मंदिर आहे याचा देखील काय पुरावा ?
(असे बरेच प्रश्न हरी वसंताला विचारू लागला. )
वसंता- हे पहा मला खात्री आहे तिथे काहीतरी भयानक गुपीत दडलंय. कारण आज जे मला समजलंय तेच मला आजीने देखील एकदा सांगितलं होत. पौर्णिमेला आपल्या गावात पहाटे तो आवाज ऐकू येतो. आणि माझी आजी खोट बोलूच शकत नाही.
या वादानंतर त्या दोघांमध्ये एक पैज लागते आणि जो हरेल त्याने पुढचा एक महिना दुसऱ्याचा गृहपाठ करायचा.
झालं तर मग ठरलं... आज संध्याकाळीच पैजेला सुरुवात होणार होती कारण दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी होती आणि म्हणून घराबाहेर जाण्याचं निम्मित मिळत होत.
वसंता घरी खोट बोलून बाहेर पडला तो ते थेट हरीच्या घरीच... दोघांनाही घराबाहेर पडायचं होत म्हणून दोघेही तिसऱ्या मित्राच्या घरी उद्या सत्यनारायण पूजा आहे असं सपशील खोट कारण सांगून बाहेर पडले.
संध्याकाळचे ५ वाजले होते. दोघेही गावाबाहेर वेशीपाशी येऊन थांबले. जशी लोकांची वर्दळ संपली तशी लगोलग पैजेला सुरुवात केली.
तर पैज अशी होती की वसंता ज्या मंदिराबद्दल सांगत होता त्यावर हरीचा विश्वास नव्हता आणि म्हणून हरी त्या टेकडीमागील डोंगरावरच्या मंदिरात जाणार होता आणि जर खरच असा कोणता घंटानाद आणि अश्या कुठल्या घंटा तिथे असतील तर तो त्या घंटा वाजवेल जेणेकरून त्यांचा आवाज इथे गावाबाहेरच्या वडाच्या पारावर त्याची वाट बघत असलेल्या वसंताला ऐकू येईल आणि माघारी येऊन हरी त्याचा अंधविश्वास दूर करणार.
ठरल्याप्रमाणे वसंता आणि हरी दोघेहि समोरच्या जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या पायवाटेकडे पाहत उभे असताना हरीने चालायला सुरुवात केली.
हरी इकडे तीकडे नजर टाकत पुढे पुढे चालू लागला. काही अंतर कापल्यावर जंगल दाट वाटू लागले आणि अस्ताला निघालेल्या सूर्याचा प्रकाश कमी होऊ लागला.
अंधार वाढला तशी हरीने खिश्यात असलेली बॅटरी बाहेर काढली आणि तिच्या उजेडात तो न थांबता झप झप पावले टाकत पुढे चालू लागला.
चालत चालत हरीने जवळ जवळ टेकडी पार केली. तो थकला होता; पण आपण पैज जिंकलो तर वसंता आपला सगळा च्या सगळा गृहपाठ करणार म्हणजे पुढचा एक महिना गृहपाठाचं टेन्शन नही या हव्यासापोटी तो तसाच न थांबता पुढे निघाला.
रात्र चढू लागली.
रातकिड्यांची किर्र किर्र वाढू लागली. मध्येच कोणत्यातरी प्राण्याचा कर्कश्श आवाज कानावर पडत होता. प्रचंड मोठ्या व उंच वृक्षांमुळे चंद्राचा देखील प्रकश तोकडा पडत होता आणि पायाखाली भल्या मोठ्या वृक्षवेली पसरलेल्या जाणवू लागल्या. त्या भयाण आणि काळ्याकुट्ट जंगलात हरी एका मुंगीसमान भासत असावा. त्याने जर हाक मारली तर ती हाक ऐकणारं देखील तिथे कोणी नव्हत. तेवढ्यात हरीला मागून कोणाचीतरी चाहूल लागली त्याने मागे वळून पाहिलं; पण त्याला कोणीच दिसलं नाही.
आता मात्र हरी च्या मनात भीती घर करू लागली होती; पण एवढ्या लांब येऊन खरं खोट पडताळण्यापलीकडे त्याला दुसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता. तो स्वतःजवळची सगळी हिम्मत आणि सय्यम एकवटून पुढे जात राहिला.
तेवढ्यात त्याच्या नजरेस कुठूनतरी लांबून मंद लुकलुकता प्रकाश पडला. वाऱ्यामुळे लहान लहान घंटिंचा आवाज त्याच्या कानावर पडत होता. त्या घंटीचा आवाज ऐकून
थोड्यावेळासाठी भीतीची जागा कुतूहलतेनी घेतली. मनात छोटीशी आनंदाची लहर तरली आणि हरीच्या पावलांचा वेग वाढला. तो प्रकाशाच्या आणि आवाजाच्या दिशेने पुढे सरला आणि पुढच्या काही वेळातच त्याला अस्पष्ठ पण एक पडीक वास्तू दिसू लागली. तो चालत त्या जुन्या, भयाण मंदिरापाशी येऊन पोचला.
ताबडतोप त्याची नजर तिथे मंदिरासमोर असलेल्या काळ्याकुळकुळीत दगडाने बनलेल्या त्या प्रचंड मोठ्या आणि तेजयुक्त दिव्यावर पडली. घट्ट काळोखात तो एकमेव विजेचा स्त्रोत तिथे होता.
त्या प्रकशात त्याला मंदिरावर ठेवलेली भली मोठी घंटा दिसली. तिचा व्यास एवढा मोठा होता की हरी तो पार करत करत पूर्ण मंदिराचा व्हरांडा फिरला. ती घंटा एवढी अवाढव्य होती की तिच्या वजनाने मंदिराचे वासे देखील वाकले होते. कधी ही सगळं कोसळून खाली येऊ शकतं इतकं धोकादाय ते होत. हरि ताबडतोब मंदिराच्या बाहेर आला.
मंदिराबाजूच्या झाडांवर टांगलेल्या लहान मोठ्या असंख्य घंटा दिसू लागल्या. एवढेच काय तर मंदिराचे वासे देखील कमी पडले होते एवढया घंटा तिथं बांधल्या होत्या. जवळ जवळ हजार एक असतील बुआ.... जास्त पण कमी नाही.
पण हे मंदिर आहे तरी कसलं हे त्याला नक्की समजत नव्हत म्हणून हरी पुढे सरसावला त्याने मंदिराच्या गाभाऱ्यात वाकून पहायचा प्रयत्न केला. एवढ्या अंधारात त्या प्रचंड मोठ्या दिव्याचा प्रकाशही गाभाऱ्यापर्यंत पोचत नव्हता; मग त्याने स्वतःजवळ असलेल्या बॅटरीच्या प्रकशाच्या सहाय्याने गाभाऱ्यात डोकावलं आणि.....
आणि अक्षरशः तो दोन पावले मागे आला, पोटातली भीती गर्रकन बाहेर पडली. गाभाऱ्यातली ती देवीची जुनाट, ओबडधोबड आणि कुरूप मूर्त पाहून तो चक्रावला, भीतीने अंग थरथरू लागलं, आजूबाजूच्या अंधाऱ्या आणि वंगाळ वातावरणाची त्याला खऱ्या अर्थाने भीतीदायक जाणीव झाली.
तो माघारी जायला निघालाच होता की त्याच्या लक्षात आलं; अरे हे तर एक मंदिर आहे आणि ती देवी मग काय घाबरायची गरज आहे. त्यात आपण पैज जिंकतच आलोय ह्या विचारांनी त्याने मनाची समजूत काढली आणि तो थांबला.
त्याने तिथे असलेल्या घंटा वाजवून तो भलामोठा घंटा नाद केला तरच तो पैज जिंकू शकत होता. तो दबकतच पुढे सरसावला त्याने पहिल्यांदा दिव्यापाशी ठेवलेली ती छोटी घंटी हातात घेतली आणि वाजवून पहिली ....
काहीच घडले नाही. त्याची भीती थोडी कमी झाली. मग त्यानं आजूबाजूच्या सगळ्या घंटा पटापट वाजवायला सुरुवात केली. पण त्या घंटांमधून कोणताच स्वर कोणताच आवाज येत नव्हता.
त्याला हे अजब आणि भीतीदायक वाटलं.
तरीही हरिने पुन्हा एकदा प्रयत्न करायचे ठरविले आणि आता तो जमेल तेवढ्या लगबगीने, जमेल तेवढ्या जास्तीत जास्त घंटा वाजवू लागला. पण त्याला काहीच आवाज ऐकू येत नव्हता.
पण आजूबाजूच्या रातकिड्यांचा आवाज मात्र त्याला स्पष्ट ऐकू येत होता. हरीला काहीच सुचायचे बंद झाले. त्याला राग येऊ लागला आणि त्या रागाच्या भरात तो त्या दिव्यापशी दिवा विझवायला पुढे गेला.
त्याने फुंकर मारली पण दिवा जैसे थेच... म्हणून त्याने पुन्हा जोरात फुंकर मारली.
यावेळी दिवा विझला आणि सगळीकडे एकाएकी अंधार दाटला. डोळ्यासमोर अंधाराचे जाळे पसरले. क्षणभर स्वतःला सावरून तो मागे वळून सात आठ पावलेच चालला होता तेवढ्यात त्याला अचानक चार पाच घंटांचा आवाज ऐकू येऊ लागला आणि दिव्याचा तो प्रकाश पुन्हा हळू हळू पसरू लागला.... हरीने मागे वळून पहिले, बघतोतर काय दिवा पेटलेला होता. पण; आवाज मात्र बंद.
एकदम पूर्ववत होती तशी शांतता.
तो पुन्हा घाईघाईत दिवा विझवायला गेला. जोरात फुंकर मारून दिवा विझवून तो निघाला आणि पाहतो तर काय?.... दिवा पुन्हा प्रज्वलित झाला. सगळीकडे मंद प्रकाश पसरू लागला. अचानक मंदिरातील एक घंटा वाजू लागली. हरीने डोकावून पाहिले पण त्याला काहीच नजरेस पडले नाही. आता तर हळूहळू उंच झाडांवर बांधलेल्या घंटा सुद्धा वाजू लागल्या. जसजसा प्रकाश पसरू लागला तासतासा घंटानाद वाढू लागला होता.
आपण पुढे जावं की मागे हे देखील त्याला सूचायचे बंद झाले. तो पुरता घाबरला.
हरी भीतीने थंड पडला, आजूबाजूला चक्रावून सोडणाऱ्या गोष्टी घडू लागल्या. त्याला काय करावे सुचेना. जे घडत होत ते त्याच्या समजण्यापलीकडचं होत. हरी माघारी निघाला. सगळा जीव एकवटून तो पळू लागला. वाटेत त्याला समोरून कोणीतरी येताना दिसलं; तो त्या दिशेन ओरडत हाका मारत पळत सुटला.
जवळ गेल्यावर पाहतो तर, तो त्याचा मित्र वसंत होता. वसंताला बघून त्याच्या जीवात जीव आला.
हरीची अवस्था बघून वसंताला काहीच कळेना. तो त्याला शांत करू लागला; पण हरीच्या नजरेदेखत जे घडलं होत ते पाहून त्याला काही केल्या धीर येत नव्हता.
आपल्या मित्राची ही दशा बघून वसंता पुरता घाबरला. म्हणून तो देखील हरीला काहीही पुढे न विचारता त्याच्या मागोमाग पळू लागला.
दोघेही पळत होते. जवळपास तासभर ते न थांबता तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करत होते; पण हरीच्या लक्षात आलं की आपण फिरून फिरून एकाच ठिकाणी पोचत आहोत. त्याला कळून चुकल कि त्यांना चकवा लागला आहे. म्हणजे कितीही पुढे जा शेवटी पोचणार तिथेच जिथून सुरुवात केली होती. यातून बाहेर पडण्याचा त्या दोघांना जणू मार्गच सापडणार नव्हता.
हरीचे हात पाय गळू लागले. काल संध्याकाळपासून चालून चालून तो आधीच थकला होता. त्यात त्याच्यासोबत जे जे घडलं होत आणि घडत होत या सगळ्यामुळे आता त्याच्यात जीवच उरला नव्हता. अजून एक पाउल देखील पुढे टाकण्याचे त्राण त्याच्यात उरले नव्हते.
आपले आता पुढे जे काही होईल याची कल्पना हरीला आली आणि तो थांबला. त्याने वसंताला सर्व हकीकत सांगायची ठरवली; पण त्याच्याने काहीच सांगण होईना. शेवटी हरी वसंताला म्हणाला, मित्रा तू जा गावाच्या दिशेने. मी ज्याच्यात अडकलोय त्यातून आता माझी सुटका होणे नाही आणि एवढे बोलून तो बेशुद्ध पडला.
वसंता हरीला सोडून कुठेही जाणार नव्हता. तो जमिनीवर पडलेल्या हरीला उठवायचा प्रयत्न करू लागला. वसंता क्षणभरही वेळ न दवडता पाण्याच्या शोधात निघाला. थोड लांब गेल्यावर त्याला मागून एक हाक ऐऊ आली.
‘ काय रे पोराऽऽ... कुठ निघालास? तेही एकटाच एवढ्या रात्रीचा या जंगलात?’
ती हाक ऐकून वसंताने मागे वळून पाहिलं. त्याला एक म्हातारी काठी टेकत टेकत जाताना दिसली.
ती म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. वसंता पळतच तीच्यापाशी गेला आणि विचारलं, ‘थोडं पाणी मिळेल का?’
म्हातारीने विचारलं कोण तू? एवढ्या रात्रीचा इथे काय करतोस ?
वसंता- मी वसंत. खाली गाव आहे माझं. रस्ता चुकलोय आणि माझा मित्र तोऽऽ तिथे बेशुद्ध पडलाय. थोड पाणी मिळालं तर कृपा होईल.
वसंता त्या म्हातारीला घेऊन हरीपाशी आला. म्हातारीने हरीला पाणी पाजले. हरीने हालचाल केली पण तो आजून पूर्णपणे शुद्धीत आला नव्हता.
म्हातारी - चला तुम्हाला गावात सोडते.
वसंताने त्याला कसेबसे हाताला धरून उभे केले आणि ते दोघे त्या म्हातारीच्या मागे चालू लागले. हरी बेशुद्ध अवस्थेतच काहीतरी पुटपुटत होता. वसंता त्याला सावरत म्हातारी ज्या दिशेला जाईल त्या दिशेने मागे मागे जात होता.
बघता बघता एक प्रहर उलटला. रात्र सरुन पहाट चढू लागली. जंगलाची दाटी कमी होऊ लागली.
रविकिरणांनी अंगाला लांबूनच स्पर्श केल्याचा भास होऊ लागला. भयंकर शांतता त्यात फक्त प्राणी व किड्यांचे आवाज.. हे सर्व मागे टाकून ते मानववस्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोचले. गावाची वेस आली.
वसंता हरीला आधार देत चालत होता.
तेवढ्यात म्हातारी म्हणाली; जा रे बाळांनो, आलं तुमचं गाव.
वसंताने वर मान करून गावाकडे पाहिल्यावर त्याच्या जीवात जीव आला आणि बाजूला असलेल्या म्हातारीला धन्यवाद करण्यासाठी तिच्याकडे पाहिलं तर; आजूबाजूला कोणीच नव्हत. तो भांबावला. इकडे तिकडे तिला शोधू लागला.
पण त्याला कोणीच दिसलं नाही. थोडासा घाबरला पण; हरीची अवस्था लक्षात घेऊन तो घरी निघाला.
(आज देखील वसंत कर्णिक आजोबा ही घटना सांगताना त्यांच्या अंगावर काटा येतो. ते सांगतात हरी ज्या अवस्थेत मला भेटला त्याआधी त्याच्यासोबत नक्की काय घडल असावं हे आजतागत हरी स्पष्टपणे सांगू शकला नाही.
आम्हाला ज्या म्हातारीने गावापाशी आणून सोडलं; ती त्या जंगलात काय करत होती? नंतर ती अचानक कुठे निघून गेली? सगळे म्हणायचे की तिथे कोणीच जात नव्हत, ना तिथे कोणती मनुष्यवस्ती होती; तर मग ती तिथे कशी? तेही एवढ्या रात्री?.... या प्रश्नाची उत्तरं वसंत आजोबांना आजपर्यंत सापडली नाहीत.)
तुम्हाला गोष्ट वाचून जर याचा अंदाज आला असेल की ती म्हातारी कोण होती? तिने त्या दोघांची मदत का केली? ती तिथं कशी आली? तर नक्की comment मध्ये सांगा.
ज्या प्रश्नांची उत्तरं वसंत आजोबांना सापडली नाहीत ती तुम्हाला उमगली कि नाही हे मला नक्की कळवा....
धन्यवाद.
Bhaas hota tyancha
उत्तर द्याहटवाThod lamb ahe Uttar tumch
हटवामला वाटत ती म्हातारी एक तर पुण्यात्मा असावी किंवा
उत्तर द्याहटवाधन्यवाद गोष्टपूर्ण वाचल्याबद्दल.होय. अगदी बरोबर तर्क लढलात तुम्ही.
हटवा